PM Modi Meeting : कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी ; आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर द्या – मोदी

एमपीसी न्यूज – आपल्याला जनेतला कोरोना संकटातून बाहेर काढायचं आहे. जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. आपल्याला आता अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता असून कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी. देशातील सर्व राज्यांत आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, आवश्यक आहे त्याठिकाणी मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायत कोणतीही हयगय होता कामा नये. तेलंगणा, आंध्रप्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांत दहा टक्के लस वाया गेली. असं का होतं हे तपासून पाहिले पाहिजे. कोरोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावेत असा सल्ला मोदी यांनी दिला.

संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कमीत कमी वेळात शोधून काढणं आणि आरटीपीसीआर टेस्ट 70 टक्क्यांपेक्षा अधिक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देशाल सर्व राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. असंही मोदी म्हणाले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.

कोरोनाच्या लढाईला एक वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाचा जसा सामना केला, ते एक उदाहरण बनलं आहे, त्याची प्रशंसाही झाली. आज देशात 96 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांत ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखलं पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णायक पावलं उचलावी लागतील, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.