PM Modi Address in CII: देशाची अर्थव्यवस्था लवकरच विकासाच्या मार्गावर परतेल, PM मोदींना विश्वास

pm narendra modi speech in CII at confederation of indian industry programme 2020 on economy amid coronavirus

एमपीसी न्यूज- कोरोनाचा सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.2) उद्योग जगताला मंत्र दिला. कोरोना विषाणूचा मुकाबला करुन आपण विकासाच्या वेगावर स्वार होऊ आणि हे शक्य आहे. होय, होय आपण आपला विकास पुन्हा प्राप्त करु, अशा शब्दांत त्यांनी उद्योग जगताला प्रोत्साहन दिले.

कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआयला) 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील उद्योग जगतातील दिग्गजांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आमचे सरकार खासगी क्षेत्राला देशाच्या विकास यात्रेचा भागीदार मानते, असे म्हणत आत्मनिर्भर भारत अभियानाशी निगडीत तुमच्या सर्व आवश्यकतांकडे लक्ष दिले जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

कोरोना संकटादरम्यान आपल्याला देशातील जनतेचे जीवन वाचवायचे तर आहेच. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेलाही स्थिर करायचे आहे. कोरोना संकटामुळे पूर्वीच्या तुलनेत आता जगातील इतर देशांना उर्वरित देशांची साथ हवी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.


कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पीपीई किटबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दररोज देशात 3 लाख पीपीई किट बनवले जात आहे. तीन महिन्यांच्या आतच शेकडो कोटींचा उद्योग यामुळे सुरु झाला आहे.

भारत लवकरच विकासाच्या मार्गावर येईल. ‘वी विल गेट अवर ग्रोथ बॅक’, असे त्यांनी म्हटले. कोरोना संकटादरम्यान 74 कोटी जनतेच्या घरी रेशन पोहोचवले. लॉ़कडाऊनदरम्यान सरकारने गरीबांना 8 कोटीहून अधिक गॅस सिलिंडर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात ईपीएफची सहायता केली.

ते पुढे म्हणाले, आज जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे. त्यांना भारताकडून अपेक्षा आहेत. या संकटाच्या काळात भारताने 150 हून अधिक देशांना वैद्यकीय सहायता पाठवली.

जगात भारताविषयी जो विश्वास वाढला आहे. त्याचा पूर्ण फायदा उद्योग जगत, सीआयआयसारख्या संघटनांनी घेतला पाहिजे. तुम्ही दोन पावले पुढे गेलात तर सरकार चार पावले पुढे जाऊन तुम्हाला सहाय्य करेल. पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला विश्वास देत आहे. मी तुमच्याबरोबर उभा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.