PM Pune visit Planning : पंतप्रधान मोदींच्या ‘कॉनवॉय’च्या गाड्या दाखल !

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यातील विशेष तीन गाड्या आज पुण्यात दाखल झाल्या आहेत.

उद्या (शनिवार दि.28) पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये कोविशिल्ड लसीच्या निर्मिती व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी दुपारी 1 ते 2 या वेळेत येणार आहेत. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ, संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दुपारी 12.30 च्या सुमारास लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी दाखल होतील. त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे सीरम इन्स्ट्यिट्यूटच्या हॅलीपॅडवर 1 वाजता मोदी येणार आहेत.

त्यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीरम संस्थेच्या इमारतीबाहेर व आतील परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्या संरक्षणासाठी सदैव तैनात असलेल्या तीन विशेष गाड्या आज पहाटे पुण्यात दाखल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांचे स्वागत तसेच निरोप देणे, त्यांच्या एसपीजी सुरक्षा कवचाला अडथळा येणार नाही याची खबरदारी घेत काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. एक तासांचा दौरा असला तरी यशस्वी नियोजनासाठी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी, पोलिस व विमानतळ प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.