PM warns China: जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी

PM warns China: Sacrifice of soldiers will not go in vain, we are able to answer as it is: PM Modi पंतप्रधानांनी शहीद जवानांना अर्पण केली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आम्हाला डिवचलं तर जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी चीनला ठणकावून सांगितले.

कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. ही बैठक सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसंच सर्व शहीद जवानांना दोन मिनिटं मौन बाळगून आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कायमच आमच्या शेजारील देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली. त्यांच्या भल्यासाठी प्राथर्ना केली. आम्ही कधीच कोणत्या देशाला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही. मतभेद कधीच वाद होऊ दिले नाहीत. भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत. भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही.”

“जेव्हा कधी संकटं आली आहेत, तेव्हा देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. त्याग आणि तितिक्षा आमच्या राजकीय चरित्राचा वाटा आहे. विक्रम आणि वीरताही देशाच्या चरित्राचा वाटा आहे,” असे मोदी म्हणाले.

“मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. याबाबत कुणाच्या मनातही जरासाही भ्रम किंवा संशय असायला नको”, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

भारताला शांतता हवी आहे. पण भारताला डिवचल्यावर कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे. आमच्या शहीद वीर जवानांचा देशाला अभिमान आहे. शत्रूला मारता मारता जवान शहीद झाले,” असं पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.