PMAY : पंतप्रधान आवासच्या आकुर्डी, पिंपरीतील सदनिका धूळखात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PMAY) पंतप्रधान आवास योजनेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर) व उद्यमनगर, पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात आला असून 938 सदनिका तयार आहेत. मात्र, प्रतिसाद नसल्याने सुमारे 87 कोटींचा खर्च करून उभारलेल्या इमारतींमधील नव्या सदनिका धूळ खात पडल्या आहेत. शहरातील इतर लाभार्थ्यांना त्या सदनिका वितरित करण्याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.

पिंपरी महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविली. त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने 20 जून 2017 ला मंजुरी दिली होती. या योजनेत चऱ्होलीत एक हजार 442, रावेतमध्ये 934, बोहाडेवाडीत एक हजार 288, आकुर्डीत 568 आणि उद्यमनगर, पिंपरीत 370 सदनिका अशा एकूण चार हजार 603 सदनिका उभारण्यात येणार होत्या. बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी व पिंपरी येथील गृहप्रकल्पाचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. तर, चऱ्होली गृहप्रकल्पाचे 85 टक्के काम झाले आहे.

चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाच्या लाभार्थ्यांकडून स्वहिस्सा घेण्यात (PMAY) आला आहे. आकुर्डी व पिंपरी हा गृहप्रकल्प रस्ते व आरक्षणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आकुर्डीत 12 मजली सहा इमारती तर, पिंपरीत 12 मजली दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करून महापालिकेने सदनिका बंद करून ठेवल्याने सदनिका धूळखात पडल्या आहेत.

रावेतमधील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प जमिनीच्या मालकी वादावरून न्यायालयात अडकला आहे. अद्यापही या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झाला नाही. असे असताना महापालिकेने दोन वर्षापूर्वी सोडत काढून नागरिकांकडून प्रत्येकी पाच हजार रूपये घेऊन ठेवले आहेत. न्यायालयाचा वाद मिटलेला नसून कामही सुरू होऊ शकले नाही.

Pune-Mumbai : 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग महागणार; जाणून घ्या नवे टोल दर

पंतप्रधान आवास योजनेत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी दोन गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. सदनिका वितरीत करताना पूर्वी निश्‍चित केलेल्या प्रयोजनात बदल करण्यात येत आहे. याची फाईल राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. शासनाने मंजुरी दिल्यास तात्काळ चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पांतील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. सध्या लाभार्थी निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांनी स्वहिस्सा भरल्यानंतर त्यांना सदनिकांचे वितरण केले जाईल, असे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.