Pune : नगरसेवकांच्या प्रश्नांना मुख्य सभेत उत्तरेच नाहीत !

पुणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी

एमपीसी न्यूज- नगरसेवकांकडून शहरांशी निगडित लिखित प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून खुलासा मागविण्यात येतो आणि त्या खुलाशाबाबत महापालिकेच्या सभागृहात चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या सोळा महिन्यात मान्यवरांनी विचारलेल्या 490 लिखित प्रश्नोत्तरांपैकी केवळ तीन प्रश्नांची सभागृहात चर्चा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते आणि त्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेत त्यावर चर्चा घडवून आणण्याची तितकीच जबाबदारी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची असते. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर किती मुख्य सभा झाल्या ? या सभांमध्ये किती प्रश्न विचारण्यात आले ? किती प्रश्नांवर उत्तरे दिली ? किती प्रश्नांवरील उत्तरांवर सभागृहात चर्चा झाली ? किती प्रश्न शिल्लक आहेत ? अशी माहिती पालिका प्रशासनाला राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी विचारली होती.

त्याबाबत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी 2017 ते 31 जुलै 2018 या कालावधीत 187 मुख्य सभा झाल्या त्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2017 या कालावधीत लेखी प्रश्‍न विचारले गेले नाहीत. त्यानंतर एप्रिल 2017 ते जुलै 2018 या कालावधीमध्ये 490 लिखित प्रश्न विचारले गेले.

त्यांपैकी केवळ तीन नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांवर सभागृहात चर्चा झाली आहे यावेळी या प्रश्नांना संबंधित इतर दहा उपप्रश्न उपस्थित केले. कार्यक्रम पत्रिका संपल्यानंतर इतर 105 प्रश्नांचा यामध्ये समावेश यात होता. अशा प्रकारच्या कारभारामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.