PMC Corona Vaccination : पुणे जिल्ह्याला मिळाल्या 2 लाख 48 हजार कोविड लस, महापौर म्हणाले धन्यवाद मोदी सरकार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 48 हजार कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरु झाला आहे. यातील शहराला 40%, ग्रामीणला 40 % आणि पिंपरी-चिंचवडला 20% टक्के लस मिळणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभारही मानले. एसवायएचआर रविवारी आणखी 1 लाख 25 हजार लस मिळणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

राज्यात सध्या लसीचा तुटवडा आहे. लस नसल्यामुळे पुण्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की आली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून केला जातो.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेऊन पुण्यासह महाराष्ट्रासाठी कोरोना लस देण्याची मागणी केली होती. यावेळी महाराष्ट्राला कोविडचे 19 लाख 50 हजार डोस दिले जातील असे आश्वासन हर्ष वर्धन यांनी दिल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सोशल मीडियावरुन सांगितले होते.

दरम्यान पुणे शहराला पुन्हा एकदा लसीचा पुरवठा झाल्याने लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा जोर पकडेल. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस यांच्या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. त्यांनाही आता हा डोस दिला जाईल. पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केवळ 25000 लसीचे डोस शिल्लक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज मिळालेल्या लसीनंतर लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा एकदा वेगाने होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.