Pune News : दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच पालिकेत प्रवेश

एमपीसी न्यूज – शहरात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत असून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपायोजना पालिकेकडून करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणि गर्दी होऊ नये म्हणून महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालयामध्ये नागरिकांना मज्जाव करण्यात आहे. अत्यावश्यक काम असेल आणि लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच यापुढे प्रवेश दिला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

कोराना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच कोरोना विषाणूचा नवा प्रकार ‘ओमायक्रॉन’ आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने सदर विषाणू प्रसार धोकादायक म्हणून जाहीर केले आहे. विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये या कारणास्तव विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याने पालिका स्तरावर खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका मुख्य इमारतीत/विविध परिमंडळ/विविध क्षेत्रिय कार्यालयात येणा-या अभ्यांगत/नागरिकांना (निर्वाचित सदस्य, पदाधिकारी वगळून) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंधक करण्यात आला आहे.

तसेच, बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग/कार्यालय प्रमुखाचे पत्र घेणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर केवळ कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेल्या नागरिकांनाच खात्री करून प्रवेश देण्यात येणार आहे तसेच नागरिक यांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे, तक्रार, सूचना या लेखी स्वरुपात ईमेलद्वारे संबंधित विभागास पाठवणे आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.