PMC order on fire cracker : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांना बंदी !

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील महापालिकेच्या मालकीची सार्वजनिक ठिकाणे शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे याठिकाणी फटाके उडविण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. तसेच कमी आवाजाचे इकोफ्रेंडली फटाके उडवा किंवा शक्यतो फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. परंतु कोरोनाकाळातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी केी जाते. तसेच मोठ्या प्रमाणात फटाक्यांमुळे वायूप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषण होते. याचे दुष्परिणाम अनेक दिवस दिसून येतात. त्यामुळे शक्य तो कमी धुराचे आणि आवाज होणार नाही, अशा इकोफ्रेंडली फटाक्यांचा वापर करावा, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात सॅनिटायजरचा वापर शक्य तो टाळावा. सॅनिटायजर आग पकडत असल्यामुळे सॅनिटायजरचा वापर करु नये. त्याऐवजी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. नियमीतपणे हात धुवावेत.

दिवाळी सणामध्ये सार्वजनिक दिवाळी फराळ आणि दिवाळी पहाट यांना कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कचा वापर न करणे, विना परवाना कार्यक्रमांचे आयोजन केल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.