PMC Pradhanmantri Aawas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन सोडतीसाठी ऑक्टोबर अखेरचा मुहूर्त

महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या 2919 घरांची सोडत

एमपीसी न्यूज : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या 2919 घरांची सोडत महिना अखेरपर्यंत‌ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात‌ येणार आहे. या सोडतीमुळे स्वस्त आणि परवडणाऱ्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांची दहा महिन्यांची प्रतिक्षा संपणार आहे.

या‌ सदनिकांसाठी‌ खरे‌तर 11 डिसेंबर 2019 रोजीच स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे ऑनलाईन सोडत काढण्यात येणार होती, मात्र हा‌ कार्यक्रम काही कारणांमुळे पुढे‌ ढकलण्यात आला होता. अखेर दहा महिन्यानंतर महापालिका प्रशासनाने सदनिकांची ऑनलाईन सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 2022 पर्यंत देशभरातील ‘प्रत्येकाला घर’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प सोडला होता. या योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या हद्दीत ज्यांचे कुठेही घर नाही, अशा 50 हजारांहून अधिक नागरिकांनी महापालिकेकडे घरासाठी अर्ज केलेला आहे.

पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यात सुमारे 8 हजार सदनिका बांधण्यांचे नियोजन केले असून त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हडपसर स.नं. 106 अ, खराडी येथील स.नं. 57, आणि वडगाव खुर्द येथील स.नं. 39 येथे इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. खराडी‌ येथील काम पाचव्या मजल्यापर्यंत‌ गेले असून या ठिकाणी पाहण्यासाठी काही सदनिका‌ सज्ज असल्याचेही‌ महापालिकेच्या‌ अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी‌ सांगितले.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडे अर्ज केलेल्या आणि त्यामध्ये पात्र ठरलेल्या नागरिकांना या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. या‌ सदनिकांसाठी जवळपास 20 हजारांपेक्षा अधिक अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले‌ आहेत. ही सोडत ऑक्टोबर म्हणजे चालू महिन्याच्या‌ शेवटच्या आठवड्यात काढण्यात‌ येणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी सल्लामसलत करून सोडत घेण्याचा दिवस जाहीर‌ करण्यात येणार असल्याचे रुबल अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसमवेत आवास‌ योजनेचे काम सुरू असलेल्या ठिकाणांना भेट देऊन काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या व त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.

शहरात नेमके कुठे होणार प्रकल्प –

१) हडपसर स. नं. 106 अ
सदनिका संख्या : 340 प्राप्त अर्ज : 1240

२) खराडी स. नं. 57
सदनिका संख्या : 786 , प्राप्त अर्ज : 2219

३) वडगांव खु. स. नं. 39, 40
सदनिका संख्या :1108 अर्ज : 2185

४) हडपसर स. नं. 89
सदनिका संख्या : 585 , प्राप्त अर्ज : 470

५) हडपसर स. नं. 106 अ 12
सदनिका संख्या : 100, प्राप्त अर्ज : 140

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III