PMC Schools Reopening : महापालिकेच्या शाळा 4 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश ; मात्र परिस्थितीनुसार निर्णय बदलू शकतो

एमपीसी न्यूज : गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून महापालिकेच्या सर्व शाळा पुर्णत: बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता नसल्यामुळे 4 जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. परंतु त्यावेळेची कोरोना रुग्णांची संख्या आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन हा निर्णय बदलू शकतो अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहे. कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि निर्बंध शिथील करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून वेळोवेळी आदेशाद्वारे प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत.

या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा आदेश मार्गदर्शक सूचना आणि अटींच्या आधिन राहून जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करुन त्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. तसेच शाळेतील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक ठेवणे बंधनकारक असणार आहे.

वर्गखोल्या, स्टाफरुम, कार्यालये आणि परिसरामध्ये शारीरिक आंतरपालन (फिजीकल डिस्टंन्सिग) ठेवून बैठक व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांकडून लेखी सहमती घेणे देखील बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे सक्तीचे असेल. या नियमांची पूर्तता झाल्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे.

या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, शाळा सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी जरी काढले असले तरी त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास हा निर्णय बदलूही शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.