PMC Schools reopens : पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरु !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेसह सर्व खासगी संस्थांच्या पाचवी ते आठवीच्या शाळा येत्या 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी शाळांनी घ्यावी, असे आदेश सर्व शाळांना दिल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली.

शालेय शिक्षण विभागाकडून राज्यभरात 27 जानेवारी पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार शाळातील दुरुस्तीची कामे व अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी वेळ लागत आहे. ही कामे युद्धस्तरावर सुरू असून 1 फेब्रुवारी पासून हे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायजर, हात धुण्यासाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहांची दुरुस्ती तसेच वर्गामध्ये बैठक व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. या सोबतच पालकांकडून संमतीपत्रक घेण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील परवानगी देण्यात आली आहे. परंतु व्हॅन मध्ये कार प्रमाणेच 4 विद्यार्थ्यांनाच परवानगी राहील. तसेच बसमध्ये ही विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखावे लागणार आहे. एक ट्रिप झाल्यानंतर व्हॅन आणि बस सॅनिटाइज करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थी शाळेत कसे जाणार याबाबतची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु शाळा प्रशासनाने त्याबाबत वाहनचालकांशी चर्चा करून योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.