Pune: हेल्मेट सक्तीच्या निषेधाची तहकूबी सभागृहात मांडणार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज : पुणे शहरात पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ पुणे महानगरपालिकेत 17 तारखेला होणार्‍या सभेवेळी निषेधाची तहकूबी मांडणार आहे, असे आश्वासन पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी हेल्मेट विरोधी कृती समितीच्या बैठकीत दिले. तसेच हेल्मेट कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील जे दुचाकीचालक हेल्मेट वापरत नाहीत. त्यांच्यावर 1 जानेवारीपासून पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या हेल्मेट सक्तीच्या विरोधात शहरातील विविध भागात राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नवी पेठ येथे हेल्मेट विरोधी कृती समितीची बैठक झाली. या बैठकीला शहरातील सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

यावेळी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक अंकुश काकडे म्हणाले की, पालकमंत्री गिरीश बापट यांची 18 तारखेला त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन पुणेकर नागरिकांच्या भावना त्यांच्यासमोर मांडणार आहे. तसेच हेल्मेट कारवाई मागे घेण्यास सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात सुमारे लाखो दुचाकी वाहने नोंदणीकृत

पुणेकरांचा हेल्मेटला विरोध नसून तो हेल्मेट सक्तीला आहे, अशी भूमिका पुणेकरांनी मांडली आहे. सध्या पुण्यातील रस्ते हे अरुंद आहेत. त्यामुळे प्रशासनाने अगोदर रस्ते व्यवस्थित करावेत. पुणे शहरात केली जाणारी हेल्मेट सक्ती पुणेकर खपवून घेणार नाहीत. सध्या पुण्यात सुमारे लाखो दुचाकी वाहने नोंदणीकृत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला पाहिजे.  हेल्मेटमुळे दुचाकीचालकाला प्रवास करणे फायदेशीर असले तरीही हेल्मेट सक्ती करू नये, अशीही भूमिका काही पुणेकरांनी मांडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.