Pune News : मनपा कर्मचाऱ्यांसाठी मिळणार सानुग्रह अनुदान

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवकांना पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी मूळ पगार, महागाई भत्ता आणि ग्रेड पे यावर एकत्रित ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापालिकेच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनांसाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘सानुग्रह अनुदानासंदर्भातील संघटनांबरोबरचा पाच वर्षांचा करार या वर्षी संपुष्टात आला. त्यामुळे सन २०२१-२०२२ ते सन २०२४-२०२५ या कालावधीतील आर्थिक वर्षांसाठी प्रशासनाने संबंधित संघटनांबरोबर नवीन करार करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सानुग्रह अनुदानासह दर आर्थिक वर्षी अनुक्रमे सतरा हजार, एकोणीस हजार, एकवीस हजार, तेवीस हजार आणि पंचवीस हजार जादा रक्कम अतिरिक्त सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यासाठी करार करण्यासाठी आणि फक्त या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.’

रासने पुढे म्हणाले, ‘महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, शिक्षण विभागामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांना सानुग्रह अनुदाना योजनेचा लाभ मिळणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.