PMC’s fight against Corona: एक लाख अँटीजेन टेस्टींग किट्स व्यतिरिक्त खासगी प्रयोगशाळांचीही घेणार मदत

PMC's fight against Corona: Municipal Corporation's decision to make Pune city corona free पुणे शहर कोरोनामुक्त करण्याचा महापालिकेचा निर्धार

एमपीसी न्यूज – पुणे शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. कोरोनाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी एक लाख अँटीजेन टेस्टींग किट्स खरेदीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या किटमुळे अवघ्या अर्धा तासाच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. यामुळे कमी कालावधीत रुग्णांचे निदान होण्यास मदत होणार आहे. पुढील प्रक्रिया तातडीने करुन प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा प्रयत्न आहे. तर, दुसरीकडे दररोज 500 ते 1000 स्वॅब टेस्ट खासगी लॅबकडून करुन घेण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुणे शहरातील वाढत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जास्तीत जास्त लोकांची कोविड – 19 ची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवून पुणे शहर कोरोनामुक्त होण्याच्या दृष्टीने दोन टेस्ट करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे, असे हेमंत रासने यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या खाजगी लॅबकडून कोरोना संशयित रुग्णांची चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर, कोरोनाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी एक लाख अँटीजेन किट्स खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली आहे.

दोन्ही मिळून एकूण साडेसात कोटी रुपये खर्च होणार आहे. जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने उपचार करून मृत्यू रोखता येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

निर्णय चांगला, पण सर्वांनाच याचा लाभ व्हावा : दीपाली धुमाळ
एक लाख अँटीजेन किट्स खरेदीचा निर्णय घेतला आहे. सोबतच खाजगी लॅबकडूनही स्वाब टेस्ट करण्यात येणार आहे. हे दोन्ही निर्णय चांगले आहेत, मात्र याचा लाभ केवळ एकाच भागापुरता मर्यादित न राहता शहरातील सर्वच नागरिकांना याचा लाभ झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार पुणे महापालिकेला जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.