Pune Crime News : पीएमपी प्रवाशांना टार्गेट करणारी टोळी जेरबंद, 11 गुन्हे उघडकीस, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांना लुबाडणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या मुंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 11 गुन्हे उघडकीस आले असून 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सचिन सिद्राम गायकवाड (वय 37, रा. मुंढवा), सचिन दगडू जाधव (वय 38), शितल श्रीनिवास वाडेकर (वय 28, मुंढवा), अविनाश सिद्राम जाधव (वय 27, रा. केशवनगर), अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून ते शहरात चोऱ्या करत होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून शहरात पीएमपी प्रवासात लुबाडणूक होण्याच्या घटना वाढल्या होत्या. परंतु यातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. दरम्यान शहरातील सर्वच स्थानिक पोलिसांना हद्दीत गस्त घालत रस्त्यावरच्या वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच बस प्रवासात एका 48 वर्षीय महिलेची पर्स चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.

दरम्यान मुंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलेश पालवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार या गुन्ह्यातील चार जणांना ताब्यात पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या सर्वांकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना सर्वांना अटक करून सखोल चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागात चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्याकडून बंडगार्डन, स्वारगेट, वारजे माळवाडी, बिबवेवाडी, मुंढवा, डेक्कन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 11 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.