Pimpri: ….तर ‘पीएमपीएल’ बरखास्तच करा; स्थायी समिती सदस्यांचा संताप 

एमपीसी न्यूज  –  पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के हिस्सा देते. दरवर्षी पालिका तिजोरीतून कोट्यवधी रुपये देऊनही शहरातील बससेवेमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. शहरातील पीएमपीएमएलच्या तक्रारी सोडविल्या जात नसून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जात नाहीत. महापौर, आमदारांच्या पत्राला केराची टोपली दाखविली जाते. पैसे देऊनही असे होत असेल तर पीएमपीएमएल बरखास्तच करा, असा संताप स्थायी समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (मंगळवारी) पार पडली. ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेच्या विषयपत्रिकेवर पीएमपीएमएलला ऑगस्ट महिन्यातील संचलन तूट आणि पासेसपोटी सात कोटी 50 लाख रुपये देण्याचा विषय होता. पीएमपीएमलच्या सेवेवरुन नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ‘पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा चालविण्यासाठी दोन्ही महापालिका निधी पुरवितात. त्यात पुण्याचा 60 टक्के, तर पिंपरीचा 40 टक्के हिस्सा आहे. पिंपरीचा 40 टक्के हिस्सा असूनही पुण्याच्या तुलनेत पिंपरीमध्ये बसेस जास्त नाहीत. अनेक मार्गावर आजही बस धावत नाहीत. आपण 40 टक्के रक्कम देत आहोत म्हणून अशी वागणूक दिली जात असेल तर निधी वाढवून द्या. पण वाहतुक सुविधा दर्जेदार देण्यात यावी’.

‘नगरसेवकांच्या तक्रारी ऐकल्या जात नाही. महासभेच्या प्रमुखाने म्हणजेच महापौरांनी दिलेल्या पत्राला देखील दाद दिली जात नाही. त्यामुळे पीएमपीएमएलमध्ये पालिकेची पत काय आहे, हे एकदा तपासून पहावे. शहराला चांगली वाहतूक सुविधा भेटणार नसेल तर पीएमपीएलच्या बरखास्त करा, असा संताप डोळस यांनी व्यक्त केला.

राजू मिसाळ म्हणाले, पीएमपीएमएलमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कर्मचा-यांवर अन्याय केला जातो. त्यांना त्रास दिला जात आहे. पीएमपीएलकडून सुविधा मिळत नाहीत. प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत आहेत.

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, वाहतूक सुविधेबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. परंतु, निधी अडविणे चुकीचे होईल. संचलन तूट देणे गरजेचे आहे. निधी अडविल्यास शहरातील वाहतुकीवर परिणाम होईल. त्यानंतर संचल तुट देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.