Pimpri: पीएमपीएलने पाच मार्गावरील बस केल्या बंद; कारभाराबद्दल स्थायी सदस्यांचा संताप

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल)पिंपरी-चिंचवड शहरातील पाच मार्गावरील बस अचानक बंद केल्या आहेत. त्याची कोणालाही कल्पना दिली नाही. याचे पडसाद आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीत उमटले. पीएमपीच्या मनमानी कारभाराबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केला.

महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पीएमपीएमला संचलन तुटीपोटी तीन महिन्याची आगाऊ रक्कम 22 कोटी 50 लाख रुपये देण्यात आला. या प्रस्तावाला आयत्यावेळी मान्यता दिली. दरम्यान, पीएमपीएमलच्या अधिका-यांनी स्थायी समितीची सभेला उपस्थित रहावे. सदस्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे. अन्यथा संचलन तुट थांबविण्यात येईल, अशा उपसूचनेसह विषय मंजूर केला आहे.

याबाबत बोलताना नगरसेवक राजू मिसाळ म्हणाले, महापालिका पीएमपीला 40 टक्के अर्थसाहाय्य करते. परंतु, त्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. शहरातील पीएमपीएलच्या समस्याबाबत बैठक घेण्यासाठी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी 14 ऑगस्ट रोजी पत्र दिले होते. परंतु, अद्यापही बैठक घेण्यात आली नाही. त्याउलट पुण्याच्या महापौरांनी दोन दिवसांपुर्वी पत्र देऊन आज लगेच बैठक घेण्यात आली. त्यामुळे पीएमपीएमलने पिंपरीला सापत्नपनाची वागणूक दिला आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्षांचा अवमान केला आहे.

अमित गावडे म्हणाले, शहरातील पाच मार्गावरील पीएमपीने बस अचानक बंद केल्या आहेत. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना पिंपरी-चिंचवड पालिकेला दिलेली नाही. याबाबत विचारणा केली असता तोट्यातील मार्ग असल्यामुळे कारण दिले जाते. निगडी ते किवळे आणि किवळे ते निगडी या दोन कोणतीही पुर्वकल्पना न देता बंद केल्या आहेत.यामुळे नागरिकांना त्रास होत असून त्याचा पीएमपीएलने कोणताही विचार केला नाही.

विलास मडेगिरी म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून पीएमपीएल प्रशासनाला पीएमपीएल अध्यक्ष यांच्याबरोबर
पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रश्नाबाबत बैठक घेण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र याला उत्तर घेण्याची तसदी देखील अद्याप घेण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.