Pune News : पीएमपीएमएल कडून हडपसर ते निरा नवीन बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक 213 हडपसर ते निरा हा नवीन बस मार्ग आजपासून सुरू करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मारुती तुपे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या हस्ते हडपसर गाडीतळ येथे या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड, सहाय्यक डेपो मॅनेजर मोहन दडस, जीवन जाधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, ‘सध्या या बसमार्गावर तीन बसेसद्वारे साधारणपणे दर 60 मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले.

हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड म्हणाले, ‘हडपसर ते निरा हे अंतर 64 किलोमीटर असून या मार्गावर एकूण 114 बसथांबे आहेत. हडपसर ते निरा पहिली बस सकाळी 5.30 वा. तर शेवटची बस संध्याकाळी 8.00 वा. आहे. तसेच निरा ते हडपसर पहिली बस सकाळी 6.30 वा. तर शेवटची बस संध्याकाळी 7.40 वा. आहे.’

असा असेल बस मार्ग – 

हडपसर ते निरा या बससेवेचा मार्ग हडपसर, भेकराईनगर, देवाची उरुळी फाटा, वडकीनाला, झेंडेवाडी, दिवे, पवारवाडी, सासवड, यमाई शिवरी, तक्रारवाडी, बेलसर, जेजुरी, जेजुरी एमआयडीसी, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुरटी फाटा, राख गुळुंचे फाटा, थोपटे वस्ती, निरा असा असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.