Pune News : पीएमपीएमएलच्या मार्केटयार्ड ते खारावडे, कातरखडक दरम्यान 2 नवीन बस सुरू

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे मुळशी भागातील खारावडे परिसरातील प्रवाशांच्या व भाविकांच्या सोईसाठी नविन मार्केटयार्ड ते खारावडे मार्ग, तसेच पूर्वीच्या डेक्कन ते खांबोली मार्गाचा मार्केटयार्ड ते कातरखडक पर्यंत विस्तार रविवारी (२४ जानेवारी) रोजी मार्केटयार्ड बसस्थानक येथून या दोन्ही बससेवा मार्गांचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी पुणे महानगर परिवहन महामंडळ संचालक शंकर पवार, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, पुणे जिल्हा परिषद सदस्य शांकरभाऊ मांडेकर, परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे तसेच परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि खारावडे व पंचक्रोशीतील गावांचे सरपंच, उपसरपंच, खारावडे म्हसोबा देवस्थान समितीचे विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी प्रस्ताविक केले.

महापौर मोहोळ म्हणाले, पुणे शहर हवा व ध्वनि प्रदूषण मुक्त करण्यासाठी आमच्या कार्यकाळात बसच्या ताफ्यात महामंडळाच्या मालकीच्या 233 मिडीबस, 400 सी.एन.जी बस, भाडेतत्त्वावरील 150 वातानुकूलित स्मार्ट ई बस, 466 सी.एन.जी बसेस अशा एकूण 1249 बसेस महामंडळाला उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या फेम 2 योजनेंतर्गत 150 वातानुकूलित स्मार्ट ई बसेस व टप्प्याटप्प्याने आणखी 350 वातानुकूलीत स्मार्ट ई बसेस अशा एकूण 500 वातानुकूलीत स्मार्ट ई बसेस परिवहन महामंडळाला उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

अशा प्रकारे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सी.एन.जी व वातानुकूलीत स्मार्ट इलेक्ट्रिक बसेस मिळून एकूण 2000 बसेस धावणार आहेत. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड ही दोन शहरे हवा व ध्वनि प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या मार्केटयार्ड ते खारावडे असा नवीन बस मार्ग व डेक्कन ते खांबोली या बसमार्गाचा विस्तार झाल्याने मुळशी भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दूध व्यवसायिक यांची चांगली सोय होणार आहे, असा विश्वास महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.