PMPML News : निगडी ते लोणावळा मार्गावर लवकरच धावणार ‘पीएमपीएमएल’ची बस

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) वतीने निगडी ते लोणावळा मार्गावर लवकरच बससेवा सुरू होणार आहे. मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची ‘पीएमपीएमएल’ने दखल घेतली असून लवकरच या मार्गावर ‘पीएमपीएमएल’ची बस धावेल.

पुणे-लोणावळा रेल्वेसेवा गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे चाकरमानी, छोटे-मोठे व्यावसायिक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना ये-जा करण्यासाठी बससेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या निगडी ते वडगाव, निगडी ते कामशेत, तळेगाव-चाकण अशी बससेवा सुरू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, कामशेत ते लोणावळा या भागात बससेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे निगडी ते लोणावळा मार्गावर बस सुरू करण्याची मागणी केली जात होती.

‘पीएमपीएल’चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘निगडी ते लोणावळा मार्गावर बस सुरू करण्याबाबत अनेकांनी मागणी केली होती. त्यानुसार अंतिम परवानगी नंतर लवकरच या मार्गावर बस सुरू होईल. असे त्यांनी सांगितले.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.