Pune News : पीएमपीएमएल उभारणार 20 सीएनजी आणि पेट्रोल पंप !

एमपीसी न्यूज : आर्थिकदृष्ठ्या सक्षम होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सर्व वाहनांसाठी तब्बल 20 सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल पंप उभारणार आहेत. सर्व पंप सुरू झाले तर पीएमपीएमएल सर्वात मोठे इंधन पुरवठादार  बनू शकणार आहे.

पीएमपीएमएमलचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांमध्ये 14 बसडेपो आणि 60 मोकळ्या जागा आहेत. पुणे विकास आराखड्यामध्ये आरक्षित या जागा आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहयोगाने सर्व जागांचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या संदर्भात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, सीएनजी, पेट्रोल पंप उभारणी संदर्भात हिंदूस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, महेश गॅस यांच्यासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. काही कंपन्यांनी पेट्रोलपंपसाठीच्या जागा निश्चिती देखील केली आहे.

पीएमएमपीएमएल कर्मचारी कल्याण मंडळाच्या वतीने हे पंप कार्यान्वित केले जातील. या पंपांमुळे वार्षिक 30 कोटी रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळू शकेल. तसेच जो नफ्यातून मिळणारा पैसा मिळेल त्याचा उपयोग कर्मचाऱ्यांच्या सोई सुविधांसाठी वापरता येऊ शकणार आहे.

दोन्हा शहरातील सर्व वाहनांना या पंपांवर पेट्रोल, डिझेल आणि एमएनजीएल पुरवठा केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करत असल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून सवलत देखील दिला जाणार आहे. त्यामुळे पीएमपी डेपोवर सीएनजी, डिझेल स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकणार असल्याचेही जगताप यांनी संगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.