PMRDA News : हवेलीतील वडाचीवाडी नगररचना योजना मंजूरीसाठी शासनाकडे

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA News) वतीने हवेलीतील वडाचीवाडी येथील 134.79 हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक योजना मंजूरीसाठी शासनाकडे सादर केली आहे.

पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले आहे. पीएमआरडीएच्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजनांपैकी वडाचीवाडी नगर रचना योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्यानंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद रवींद्र जायभाये या सहाय्यक संचालक नगर रचना दर्जाच्या अधिकाऱ्याने लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे.

PCMC News : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात सलग दुस-या वर्षी महापालिका राज्यात अव्वल

सुमारे 1700 खातेदार शेतकरी यांची 131.84 हेक्टर क्षेत्र व 2.95 हेक्टर नाल्याचे क्षेत्राचा या नगररचना योजनेत समावेश आहे. त्यामध्ये 50% क्षेत्राचे 148 विकसित अंतिम भुखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी 11.72 हेक्टर क्षेत्राचे 9 भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.

या योजना क्षेत्रात सुमारे 19.22 % क्षेत्र (25.33 हे.आर.) रिंगरोड (9.83 हे.) व अंतर्गत रस्ते(15.50 हे.), मैदानांसाठी 7 भूखंड, बगीचासाठी 11 भूखंड, बालोद्यानासाठी 8 भूखंड, ग्रीन बेल्टसाठी 2 भूखंड व 2 खुल्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

या शिवाय नागरी सुविधांमध्ये (PMRDA News) प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, शॉपिंग सेंटर यासाठी देखील भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.

या नगर रचना योजनेतून 65 मीटर रुंदीच्या 1.5 किलोमीटर रस्तासाठी लागणारे सुमारे 9.83 हेक्टर आर क्षेत्र ताब्यात येईल. या योजनेचे लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.