Pune : पीएमआरडीए’चा पहिला कचरा प्रकल्प हिंजवडी एमआयडीसीच्या जागेत

एमपीसी न्यूज : कचऱ्याची गंभीर समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फ (पीएमआरडीए) मानवी वस्तीपासून दूर अंतरावर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार ‘पीएमआरडीएचा पहिला कचरा प्रकल्प हिंजवडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेत साकारला जाणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

हिंजवडी एमआयडीसी परिसरात मेगा पोलीसच्या पलीकडे एक जागा कचरा प्रकल्पासाठी पाहण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या डीपीआरचे काम सध्या सुरू असून, हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास हिंजवडी, माण, मार्जी, नेरे अशा सहा गावांचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मिटणार आहे. संबंधित जागा एमआयडीसीची आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली आहे.
आतापर्यंत विविध ग्रामपंचायतीना ‘पीएमआरडीए’ कडून कचरा गाड्या पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, आता ‘पीएमआरडीए’ स्वत: कचरा प्रकल्पांसाठी पुढाकार घेत आहे. हिंजवडी येथे पीएमआरडीएचा पहिला कचरा प्रक्रिया प्रकल्प केला जाणार आहे. गावापासून दूर असल्याने या प्रकल्पाला कोणाचा विरोध होणार नाही. पुण्याच्या आजूबाजूला सुमारे ३५ गावे आहेत. या गावांचा कचराप्रश्न मिटविण्यासाठी शंभर ते दीडशे टनांचे छोटे छोटे चार प्रकल्प केल्यास कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. याकरिता ‘पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात चार जागा कचरा प्रकल्पासाठी गावापासून दूर राखून ठेवण्यात येणार आहेत आणि चार जागा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी (सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग प्लॅण्ट) राखीव ठेवण्यात येणार आहेत, असेही गिते यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.