Nigdi: … जेव्हा मध्यरात्री कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना मिळते चहा व अल्पोपहाराची सेवा!

एमपीसी न्यूज – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे आरोग्य दूत, प्रथम मदतनीस, एसपीओ यांनी कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत जनतेच्या सेवेसाठी शहरात कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांसाठी मध्यरात्रीच्या कालावधीत चहा व अल्पोपहार पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

समितीचे सर्व स्वयंसेवक हे मध्यरात्री प्रत्येक चौकात जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चहा व अल्पोपहार जागेवर पोहचविण्याचे काम करीत आहेत.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 म्हणजेच कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. स्वतंत्र भारतामध्ये अशी आरोग्य आणीबाणी पहिल्यांदाच देशाची करोडो जनता अनुभवत आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर आणि मुंबई या तीनही मोठ्या शहरात सर्वात जास्त कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अशाही परिस्थितीत मात्र पोलीस, डॉक्टर्स, आणि स्वच्छता व सफाई कामगार अहोरात्र रस्त्यावर शहरवासीयांची सेवा करीत आहेत. अशा सुरक्षा दूतांना मात्र दैनंदिन मूलभूत आहार सेवा-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.

प्रशासनाचे कायदेशीर नियम पाळून प्रत्येक चौकी अंतर्गत चार स्वयंसेवक एसपीओ – फर्स्ट एड रिस्पॉण्डर पिंपरी चिंचवड आयुक्तालय विभागाकरिता कार्यरत आहेत.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना घाळी, विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, जयेंद्र मकवाना, अॅड. विद्या शिंदे, जयप्रकाश शिंदे, विशाल शेवाळे, अजय घाडी, सुरेश येरूनकर, सतीश मांडवे, विशाल शेवाळे, राजेश बाबर, तेजस सापरिया, अमित चौहान, संतोष चव्हाण, अमोल कानु, अमित डांगे, अमृत महाजनी, विशाल माने हे प्रमुख एसपीओ विभागवार कार्यरत आहेत.

या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, कोविड – 19 म्हणजेच कोरोना विरुद्ध आता निर्णायक लढाई देशात सुरू झाली आहे, या विषाणू विरुद्ध महाराष्ट्र प्रशासन निकाराने लढा देत आहे.पोलीस प्रशासन सुद्धा रात्रंदिवस त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावत आहे. याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एसपीओ सुद्धा प्रशासनाला आता मदत करीत आहेत. समितीचे सर्व एसपीओंचे आपत्कालीन सेवेचे म्हणजेच फर्स्ट एड रिस्पॉण्डरचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. असे प्रशिक्षित अनुभवी एसपीओ आता नागरिकांच्या सेवेकरिता सज्ज आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.सदरचा कर्फ्यू कडकपणे पाळणे सर्व देशवासीयांचे कर्तव्य आहे. सर्वांनी सजग आणि सावध राहणे आवश्यक आहे. तरच कोरोनाचे संक्रमण वर्तुळ तुटेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.