Chinchwad News : घटना, दृष्टी आणि मन यांच्या एकत्रीकरणातून काव्यनिर्मिती – तुकाराम पाटील

एमपीसी न्यूज – घटना, दृष्टी आणि मन यांच्या एकत्रीकरणातून काव्यनिर्मिती होते,  असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले.

नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित आणि कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित ‘स्वप्नं बिलोरी’ या कवितासंग्रहाच्या कुणाल प्लाझा, चिंचवडस्टेशन येथे झालेल्या  प्रकाशन प्रसंगी प्रा. पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोजा, ह.भ.प. रविकुमार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशनापूर्वी, वंदना इन्नाणी (‘स्वप्नं’), उज्ज्वला केळकर (‘प्रेम म्हणजे…’) , वर्षा बालगोपाल (‘समर्पण’) आणि रजनी अहेरराव (‘हरवलेलं पत्र’) यांनी कवयित्री प्रज्ञा घोडके यांच्या नूतन काव्यसंग्रहातील कवितांचे अभिवाचन केले.

प्रज्ञा घोडके यांनी आपल्या मनोगतातून, “माझ्या गावाने मला काव्यलेखनाची प्रेरणा दिली. आईवडील दोघेही शिक्षक असल्याने बालपणापासून मी एकांतात राहायला शिकले. त्यावेळी मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पाहताना अंतर्मनातील स्वप्नं शब्दरूप घेऊन प्रकट होऊ लागले. त्याला आईने खूप प्रोत्साहन दिले!” अशा शब्दांतून आपल्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नंदकुमार मुरडे म्हणाले की, “जेव्हा प्रतिभेच्या भावविश्वात संवेदना झिरपू लागते; तेव्हा तिचा आस्वाद घेणारे शब्द अर्थधुंद होऊन नृत्य करू लागतात अन् त्यातून कविता जन्माला येते. विविध संवेदनांचा परिपोष ‘स्वप्नं बिलोरी’ या कवितासंग्रहातून झालेला आहे. कवितेचे सामर्थ्य प्रचंड आहे; कारण एक ‘वंदे मातरम्’ संपूर्ण राष्ट्र एकसंध करू शकते!” राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले. कैलास भैरट यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. पांडुरंग घोडके, निशिकांत गुमास्ते, श्रीकांत दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, “मानवी मनांत रुजणाऱ्या कल्पनांच्या प्रतिबिंबांमधून कविता निर्माण होतात. त्या कवितांना स्वानुभव अन् वास्तवाची जोड लाभली तर त्यांना चिरंजीवत्व प्राप्त होते. अशा कविता रसिकांना चिरंतन आनंद देतात. याशिवाय रसिकांना अनेक अन्वयार्थ लावता येणे, हे समृद्ध कवितेचे वैशिष्ट्य मानले जाते. अशा वैशिष्ट्यपूर्ण कविता प्रज्ञा घोडके यांच्या काव्यसंग्रहात आढळून येतात!”

पी.बी. शिंदे, अक्षय लोणकर, सुप्रिया लिमये, माधुरी डिसोजा, जयश्री गुमास्ते या रसिकांची या सोहळ्यात उपस्थिती होती. राज अहेरराव, दत्तात्रय घोडके, निरंजन घोडके, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले. ऐश्वर्या घोडके यांनी स्वागतगीत म्हटले आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.