Pune News : पोलिसांच्या सतर्कतेने कोथरूडच्या कृष्णा हॉस्पिटल मधील 20 रुग्णांचे प्राण वाचले

एमपीसी न्यूज : कोथरूड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी ऑक्सीजन साठा संपत आल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. कारण रुग्णालयातील 20 रुग्ण ऑक्सिजनवर होते. 30 ते 45 मिनिटे पुरेल इतकाच साठा शिल्लक होता. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर ही प्रचंड घाबरले होते. परंतु त्यांनी पोलिसांना फोन करून रुग्णालयातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सतर्कता दाखवत काही वेळात रूग्णालयाला पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

पुण्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शहरातील रुग्णालयांवर ताण वाढला आहे. काही रुग्णालयात तर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. रुग्ण दगावल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्येही शनिवारी सकाळी ही वेळ आली होती.  कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने कोथरूड पोलिसांना फोन करून 30 ते 45 मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे सांगितले. पण इतर रूग्णालयात जागा नसल्यामुळे ऑक्सीजनवर असणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयातही हलविता येणार नसल्यामुळे या रुग्णांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.

घटनेचे गांभीर्य ओळखून कोथरुड पोलिसांनी तात्काळ ऑक्सीजन साठा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या रुग्णालयात धाव घेऊन पोलिसांनी त्यांना घटनेचे गांभीर्य आणि परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच सूर्यप्रभा रुग्णालय आणि सह्याद्री रुग्णालय यांच्याकडून ऑक्सिजनचे चार जम्बो सिलिंडर तत्काळ उपलब्ध करून दिले.

त्यानंतर शिवाजीनगर येथुन सिलेंडर आणण्यासाठी वाहन व क्रेन उपलब्ध करून देऊन पोलीस संरक्षणात केवळ एक तासाच्या आत कृष्णा हॉस्पिटलला पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिला. कोथरूड पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऑक्सिजन अभावी रुग्णालयातील 20 रुग्णांच्या जीवाला होणारा संभाव्य धोका टळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.