Dehuroad : ‘त्या’ चिमुरडीच्या ‘मयत’ बापाला पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहून प्रसुत झाली. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आपल्यावर अत्याचार करणारा सात महिन्यांपूर्वी ट्रक अपघातात मृत्यूमुखी पडल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. गुन्हा देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने देहूरोड पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या तपासात पोलिसांना या प्रकरणातील आरोपी मयत नसून तो जिवंत असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे.

संतोष व्यंकटी ऊर्फ छगन पवार (वय 23, रा. नळद, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आळंदी येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्याद दिल्यानंतर घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आळंदी पोलिसांनी हा गुन्हा देहूरोड पोलिसांकडे वर्ग केला.

आरोपी संतोष आणि फिर्यादी यांची ऐकमेकांशी ओळख आहे. आरोपीने फिर्यादी तरुणीस अप्पुघर येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे ती तरुणी गर्भवती राहिली. 8 मे 2017 रोजी तिने एका मुलीस जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळविले. त्यानंतर फिर्यादी तरुणीने आळंदी पोलिस ठाण्यात आरोपी पवार याच्या विरोधात फिर्याद दिली. मात्र आपल्यावर अत्याचार केल्यानंतर दोन महिन्यांनी आरोपी पवार हा ट्रक अपघातात मयत झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे गुन्हा दाखल करताना आळंदी पोलिसांनी आरोपी मयत असल्याची नोंद केली.

फिर्यादी तरुणी आळंदी येथे राहत असली तरी सदरचा गुन्हा हा देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासाकरिता तो देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपी मयत झाल्याने गुन्हा दप्तरी दाखल करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या अपघाताचे कागदपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र असा काहीच अपघात झाल्याची नोंद पोलिसांना मिळाली नाही. यामुळे पोलिसांनी अधिक तपास केला. या तपासात आरोपी पवार हा जिवंत असल्याचे दिसून आले. तो खेड तालुक्यातील धानोरी येथील गावडे शॉपमध्ये कामाला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. अधिक तपास देहूरोड पोलिस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.