Pune: मालकाच्या घरावर डल्ला मारणा-या नेपाळी आरोपींना ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत उत्तरप्रदेशातून केले जेरबंद

एमपीसी न्यूज – घर मालक भिमाशंकर येथे देवदर्शनाला गेल्याचा फायदा घेत बंगाल्यातून 35 लाखाची रोकड  लंपास करणा-या नेपाळी टोळीतील दोघांच्या पुणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातून मुसक्या आवळल्या. ट्रॅव्हल्सचा पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.  त्यांच्याकडून 18 लाख 96 हजार 139 रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.

केशर प्रेम साही(वय 23, ) आणि  कृष्णा ब्रिकबहादूर शाह (वय 35, रा. पुणे, मूळ नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

बोपोडी येथील रहिवाशी असलेले आशिष भवरलाल जैन हे 10 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबासह भिमाशंकर येथे देवदर्शनाला गेले होते. मालक घरी नसल्याचा फायदा घेत त्यांच्या बंगल्यावर काम करणा-या आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह मालकाच्या बंगल्यामध्येच घरफोडी केली. 34 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

आरोपी नेपाळचे असल्याने ते नेपाळला पळून जाण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. चो-या करणारे नेपाळी आरोपी चोरीच्या मालाची विभागणी करुन वेगवेगळ्या मार्गाने नेपाळला पळून जात असल्याची माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. आरोपी नेपाळला जाण्याच्या मार्गावर पोलिसांनी पथके तैनात केली. तसेच भारत सीमेवर देखील पथके पाठविण्यात आली होती. वेगवेगळ्या मार्गांवरून आणि सीमांवरून जाणा-या वाहनांची आणि प्रवाशांची पोलिसांनी तपासणी केली.

आरोपी केशर आणि कृष्णा गाझियाबाद हायवे वरून जाणा-या  ट्रॅव्हल्समधून नेपाळला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18 लाख 96 हजार 139 रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला असल्याचे, पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.