Pimpri News : स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिल्यानंतर रिक्षात बेवारसपणे सोडणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या स्वच्छतागृहात रात्रीच्या वेळी बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या नवजात अर्भकाला बेवारसपणे एका रिक्षात टाकून दिल्याचा प्रकार घडला. मोरवाडी येथे शनिवारी (दि. 27) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बाळाला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक अज्ञातांनी टाकून दिले. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अर्भकाला ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरवाडी परिसरात पोलिसांनी तपास केला. एक महिला गरोदर होती, अशी माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेत संबंधित महिलेला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. बाळाला आपणच जन्म देऊन रिक्षात टाकून दिले असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. त्या महिलेने हा प्रकार का केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.