Pune News : चोरांना पाहून पोलीस पळाल्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह चौघांना अटक

एमपीसी न्यूज : काही दिवसापूर्वी पुण्याच्या औंध परिसरातून चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना उघडकीस आली होती. यातील आरोपीने तेव्हा पोलिसांच्या समोरून पळ काढला होता. या घटनेनंतर चहुबाजूंनी पुणे पोलिसांवर टीका करण्यात आली होती. अखेर यातील मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. 

बितूसिंग शामसिंग कल्याणी (वय 24, रा. हडपसर), रविसिंग शामसिंग कल्याणी (वय 22), हुकूमसिंग रामसिंग कल्याणी (वय 28) व संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय 37) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

पोलिसांना शस्त्राचा धाक दाखवून पळवणाऱ्या आरोपींमध्ये बीतूसिंग हा प्रमुख होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी औंध भागात सोसायटीत चोरटे शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर चतुःश्रुगी पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलीस हवालदार प्रवीण गोरे व पोलीस नाईक अनिल अवघडे दोघे तेथे गेले होते.

पण गेटवर आल्यानंतर शस्त्रधारी चोरटे पाहून पोलीस पळून गेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. चोरटे मुद्देमाल, शस्त्र कटावनी व इतर साहित्य घेऊन जाताना स्पष्ट दिसत होते. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांची मात्र पुणेकरांत नाचक्की झाली होती. पोलिसच पळून चालले तर कस असा प्रश्न पुणेकरांनी विचारण्यास सुरुवात केली होती.

त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान झाले होते. त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता. यादरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा आणि चतुःश्रुगी पोलीस करत होते. यावेळी गुन्हे शाखेला बीतूसिंग हा साथीदारांना घेऊन शेवळवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचून चौघांना पकडले. त्यावेळी चौकशी केली असता बीतूसिंग याने गुन्ह्याची कबुली दिली.

बीतूसिंग हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याबर 58 गुन्हे दाखल आहेत. तर रविसिंग याच्यावर 49 गुन्हे दाखल असून, हुकूमसिंग याच्यावर 26 गुन्हे तर संगतसिंग याच्यावर 42 गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.