Pune News : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा 54 वा मोक्का, भापकर टोळी येरवडा कारागृहात

एमपीसी न्यूज : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. डोके वर काढू पहाणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी शहरातील 53 गुन्हेगारी टोळ्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. त्यामध्ये अजून एकाची भर पडली असून लोणीकाळभोर परिसरातील भापकर टोळीवर आज मोक्का लावण्यात आला आहे.

टोळी प्रमुख आकाश दादासाहेब भापकर (वय 19), योगीराज उर्फ भैय्या पानसरे (वय 21), अभिजीत संजय सावंत (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी एक ऑगस्ट रोजी मुंढवा परिसरात एका अल्पवयीन मुलाला गाडी पुसायला कापड न दिल्याच्या कारणावरून चाकूचे वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या मुलाचे चे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांच्यावर देखील चाकूने वार केले होते. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान आरोपींना अटक केली असता आरोपींनी हिसक मार्गाचा अवलंब करून स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व राहावे म्हणून अवैध मार्गाने गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले. यातील आरोपीविरुद्ध हडपसर पोलीस पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी आणि गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे पाच गंभीर गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता मोक्का नुसार कारवाई करावी असा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यानंतर वरिष्ठांनी या सर्वांवर मोक्का नुसार कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पदभार स्वीकारल्यानंतर नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीरा विरुद्ध व मालमत्ता विरुद्ध गुन्हे करणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत पुणे शहरात 54 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई  करण्यात आली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.