Pimpri: बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पोलिसांना नाही वेळ!

पदाधिका-यासोबतची बैठक टाकली लांबणीवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी मात्र पोलिसांना वेळ नाही. वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) महापौर राहुल जाधव यांनी पदाधिकारी आणि पोलिसांची संयुक्त बैठक लावली होती. तथापि, आज वेळ नसल्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी थेट महापौरांना पाठविले.  उद्या किंवा परवा बैठक घेऊ असेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीकडे पोलीस गांभीर्याने पाहत आहेत की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहारासाठी 15 ऑगस्ट 2018 पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. परंतु, पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी नियंत्रणात आली नाही. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचार, खून, मारामा-या, विवाहित महिलांचे मंगळसूत्र हिसकाविणे, दिवसा-ढवळ्या तोडफोड, पोलिसांकडूनच तक्रारदार महिलेचा विनयभंग अशा घटनांनी शहर हादरुन गेले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासिय भयभीत झाले आहेत.

या वाढत्या गुन्हेगारीचे महापालिकेच्या सभेत तीव्र पडसाद उमटले होते. महिला नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. नगरसेवकांनी पोलिसांच्या कामकाजावर आक्षेप घेत हल्ला चढविला होता. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी यामध्ये पुढाकर घेतला होता. त्यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याबरोबर शहरातील आमदार, महापालिकेती पदाधिकारी आणि नगरसेवकांची आज सोमवारी चिंचवड अॅटो क्लस्टर येथे संयुक्त बैठक लावली होती. तथापि, पोलिसांनी वेळ नसल्याचे कारण पुढे करत ही बैठक लांबणीवर टाकली. तसे पत्रच महापौर जाधव यांना पाठविले. तसेच उद्या की परवा पदाधिका-यांच्या वेळेनुसार बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

याबाबत बोलताना महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी आणि पोलिसांची आज बैठक लावली होती. परंतु, बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांना आज वेळ नव्हता. त्यामुळे ही बैठक आता बुधवारी (दि.17) होणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.