Pune : पोलीस मित्रांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत – विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक

पोलीस मित्र गौरव पुरस्कार २०२० वितरण सोहळा

एमपीसी न्यूज – पोलिसांनी संयम ठेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दैनंदिन कायदा सुव्यवस्थेत राज्यातील अथवा देशातील पोलीस विभागाची संख्या पाहिली असता या कामात मर्यादा येऊ शकतात. परंतु पोलीस मित्रांच्या सहका-यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे अतिशय सोपे होते. अनेक अवघड गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस मित्रांच्या मदतीमुळे ते गुन्हे सोडविण्यास मदत होते. तसेच पोलीस घटनास्थळी पोहचण्याआधी पोलीस मित्रांच्या सर्तकतेमुळे गुन्हेगार सापडतो. अनेकदा मोठे गुन्हे पोलीस मित्रांच्या दक्षतेमुळे टळतात, असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) दत्तात्रय मंडलिक यांनी व्यक्त केले. 

पोलीस मित्र संघातर्फे पोलीस मित्र गौरव पुरस्कार २०२० व पोलीस मित्र दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांना यावेळी पोलीस मित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, विद्या जाधव, पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मंडलिक, वर्षा मंडलिक, अकबर मेनन, जयराज लांडगे आदी यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला आणि पोलीस मित्र दिनदर्शिका २०२० चे प्रकाशन तसेच मोफत वितरण देखील करण्यात आले.

विठ्ठल जाधव म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारी देखील वाढत आहे आणि वाढत्या गुन्हेगारीबरोबर गुन्हे करण्याची पद्धत देखील बदलत आहे. त्यामुळे गुन्हेगार शोधण्याचे तंत्रज्ञान देखील बदलत आहे. समाजातील आजची परिस्थिती पाहता पोलिसांनी शांतता आणि धार्मिक सलोखा राखून काम करण्याची गरज आहे. समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस खात्याला पोलीस मित्रांची खूप मोठी मदत होत आहे. शांतता समितीचे सदस्य, शांतीदूत, पोलीस मित्र यांनी मानव सेवा धार्मिक सलोखा आणि समाजात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत मंडलिक म्हणाले,  पोलीस खात्यातील कायदे व सुव्यवस्था सांभाळून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांना मदत करणा-या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी पोलीस मित्र संघातर्फे पोलीस मित्र गौरव पुरस्कार दिला जातो. पोलीस खाते, महसूल विभाग व वन विभाग तसेच सर्व सामान्य जनतेला आवश्यक असणारे अत्यंत महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक असणा-या दिनदर्शिकेचे मोफत वितरण केले जाते. चंद्रकांत मंडलिक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.