_MPC_DIR_MPU_III

Pune : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

स्पर्धेच्या पदकांचे अनावरण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या पदकांचे अनावरण आज परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे करण्यात आले. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पहिलवान, पंच, प्रशिक्षकांच्या वर्दळीने क्रीडा संकुलात नवचैतन्य संचारले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

स्पर्धेचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, संग्राम थोपटे, सुनील शेळके, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवडीचे उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, क्रीडा व युवक सेवा मुख्यालयाचे उपसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आदि उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाच्या पूर्व संध्येला परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, प्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी आखडे व तयारीची पाहणी केली.

_MPC_DIR_MPU_II

शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या खेळाची भव्यता आणि लोकप्रियतेची प्रचिती स्पर्धेसाठी सज्ज झालेले आखाडे बघून येते. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येथे मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत १००० लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक आणि ६० लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झाले आहेत. पहिलवानांना स्पर्शांतून, जखमातून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चारही आखडे तयार आहेत. आखाड्यांचा हा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर १० फूट भाग पहिलवानांच्या तयारीसाठी सज्ज करण्यात आहे.

सकाळ पासून राज्यातील ४४ जिल्ह्यांमधून पहिलवनांचे आगमन सुरू झाले असून तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर व १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झालेत. दिवसभरात पंचांचे दोन उजळणी सत्र झाले. उद्या सहभागी होणार्‍या ‘अ’ विभाग (५७ व ७९ किलो)गटातील तब्बल २०० पहिलवानांची आज वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.