Chinchwad News : ‘पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन’च्या वतीने पोलीस व सैनिकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – ‘पोलीस फेंड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘शूरा आम्ही वंदिले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील पोलीस व सैन्य दलातील कर्तबगार अधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरूवारी (दि.25) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरा नानी घुले, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कीर्ती चक्र सन्मानित संतोष राळे, कमांडर रघुनाथ सावंत, तहसिलदार गीता गायकवाड, समाजकल्याण विभागाचे वाघमारे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, रुपाली दाभाडे, विनेश भोजे, कमलजित सिंग, ललिता चिंचवडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया म्हणाले, देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलीस यामुळेच आपण सुखाची झोप घेत आहोत. त्यामुळे पोलीस बांधवांचा केलेला सन्मान अभिमानास्पद आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन पोलिसांविषयी करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. आज सैनिक व पोलीस देशाला सुरक्षितता पुरवणारे महत्त्वाचे दोन घटक आहेत. समाजकंटकांचे निर्दालण करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पोलिस आणि नागरिक एकत्र येऊन आणखी चांगले काम करु शकतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र पुण्यापेक्षा मोठे आहे. परंतु, कर्मचारी संख्या कमी आहे.’

महापौर माई ढोरे म्हणाल्या, एखादी संस्था स्थापण करणे सोपे असते, पण समाजोपयोगी उपक्रम राबवित संस्था चालविणे, ही अवघड गोष्ट आहे. महापालिकेतर्फे पोलिसांच्या अडचणींची नेहमी आम्ही दखल घेत असतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन चिंचवडे यांनी, सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले, तर रुपाली दाभाडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.