Pune : पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली

एमपीसी न्यूज – दबंग पोलीस निरीक्षक म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची सातारा येथून पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या बदलीचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काढले.

विश्वास नांगरे पाटील यांनी काढलेल्या आदेशात तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष गिरीगोसावी (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), विजय कुंभार (सोलापूर ग्रामीण ते सातारा) आणि पद्माकर घनवट (सातारा ते पुणे ग्रामीण) या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत जमीन खरेदी-विक्री वरून वाद, कंपन्यांमधील काम आणि कंत्राटे यावरून वाद होत असून यातून अनेक भाई दादांची संख्या वाढली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचा पदभार घेतल्यानंतर अनेक भाई दादांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ म्हणून समजल्या जाणा-या पद्माकर घनवट यांची बदली पुणे ग्रामीण मध्ये झाल्याने तथाकथित भाई दादांना दरदरून घाम फुटला आहे. पद्माकर घनवट सातारा पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सातारा एलसीबीचा कार्यभार त्यांच्याकडे होता.

पद्माकर घनवट यांनी 11 जून 2014 रोजी सातारा एलसीबीचा पदभार स्वीकारला होता. यांच्या एलसीबी पथकाने 50 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. 42 खून, 31 दरोडे, 588 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 42 बेकायदेशीर पिस्तुले पकडली आहेत. मांडूळ चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. सर्वसाधारण पोलीस अधिका-यांची बदली दर दोन वर्षांनी होते. मात्र त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना आणखी अडीच वर्षे म्हणजेच एकूण साडेचार वर्षे सातारा एलसीबी पथकात काम करण्याची संधी मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.