Pimpri : सुरक्षित दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांच्या सूचना

एमपीसी न्यूज – गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा दिवस दहीहंडी उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या उत्सवासाठी राज्यभर उत्साहाचे वातावरण असते. बहुतांश दहीहंडी मंडळे सिनेकलाकारांना बोलावितात. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात. असा विविधांगांनी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. परंतु हा उत्सव साजरा करत असताना दहीहंडी पथकातील गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास काही ठिकाणी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे दहीहंडी फोडताना अनुचित प्रकार घडून गोविंदांना जीवघेण्या संकटांना सामोरे जावे लागते. हा उत्सव शांततेत आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दहीहंडी पथकांना आणि नागरिकांना सूचना केल्या आहेत.

दहीहंडी मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच वर्गणी मागता येईल. तसेच आलेल्या वर्गणी आणि खर्चाचा हिशोब देखील दर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. गोविंदा पथकातील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काळजी घ्यावी. दुर्घटना घडल्यास गोविंदाला तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच ध्वनीक्षेपकांमधून येणारा आवाज मर्यादित असावा. शांतता झोनमध्ये 50 डेसिबल, निवासी झोनमध्ये 55 डेसिबल, वाणिज्य झोनमध्ये 65 डेसिबल आणि औद्योगिक झोनमध्ये 75 डेसिबल पर्यंत आवाज चालेल. यापेक्षा आवाजाची पातळी वाढली तर संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 15 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. यामध्ये पाच वर्ष कैद आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच भारतीय दंड विधान आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये देखील गुन्हा नोंद होऊ शकतो.

गोविंदा पथके आणि दहीहंडी कार्यक्रम आयोजन मंडळांनी घ्यावयाची खबरदारी –

# प्रत्येक गोविंदाचा नाव, पत्ता व वयाचा पुरावा जमा करावा.
# दहीहंडीत थराची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसावी.
# 4-5 थर लावावेत. त्यासाठी मॅटचा वापर करावा.
# गोविंदानी सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करावा.
# गोविंदा मंडळातील सर्व सदस्यांचा विमा करावा.
# 18 वर्षाच्या आतील मुलांना थर लावता येणार नाहीत.
# बक्षीस कोणत्या स्वरूपात देणार याची माहिती माईक किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून वारंवार द्यावी.
# ज्या ठिकाणी महिला पथक दहीहंडी फोडणार आहे, त्याठिकाणी अधिकची सुरक्षा व्यवस्था करावी.
# सिने कलाकारांचा कार्यक्रम होणार असेल तर करमणूक कर भरावा.
# सिने कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळांवर राहील. त्याबाबत सुरक्षेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात.
# कार्यक्रम स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे विडिओ शूटिंग करावे.
# ड्रोनद्वारे विडिओ शूटिंग काढण्यात येणार असेल तर त्याबाबतची विशेष शाखेकडून पूर्व परवानगी घ्यावी.
# कार्यक्रमाचे स्टेज लहान असावे. तसेच स्टेजवर कमीत कमी लोक असावेत.
# स्टेजच्या आजूबाजूला पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी. शिल्लक जनरेटर ठेवावे.
# ध्वनी क्षेपकांवर योग्य ते नियंत्रण ठेवावे. डीजे साउंड सिस्टम वापरण्यात येऊ नये. कार्यक्रमाच्या आवाजाने नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
# रुग्णालय, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय आणि न्यायालय यांच्या सभोवताली 100 मीटर कोणतेही वाद्य वाजविण्यास प्रतिबंध आहे.
# दहीहंडीचा कार्यक्रम मोकळ्या मैदानात घ्यावा.
# पार्किंगची व्यवस्था कार्यक्रम स्थळापासून सुरक्षित अंतरावर करावी.
# गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उत्सवात सहभागी होऊ देऊ नये. एखादी गुन्हेगारी प्रवृत्तीची किंवा उपद्रवी व्यक्ती कार्यक्रमात आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी.
# कार्यक्रमात कोणतेही वादग्रस्त गाणे, विडिओ, घोषणा देऊ नयेत.
# कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात येणारे फ्लेक्स कार्यक्रम झाल्यानंतर लगेच काढून ठेवावेत. तसेच त्यावरील मजकूर वादग्रस्त असू नये.
# कार्यक्रम उत्साहात, आनंदात, सुरक्षित आणि वेळेत होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.