Pune : गजानन पवार यांच्यासह पुणे पोलीस दलातील चौघांना राष्ट्रपती पोलीस पदक

एमपीसी न्यूज : उल्लेखनीय सेवेबद्दल उद्या (शनिवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त  पुणे पोलीस दलातील चौघांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून गौरविण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना पोलीस दलामध्ये आत्तापर्यंत एकूण 405 बक्षिसे मिळाली असून 2011 साली पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक मिळाले आहे. खून प्रकरणातील पळून जाणाऱ्या आरोपींनी पुणे रेल्वे स्टेशनवर केलेल्या गोळीबारात पवार जखमी झाले होते. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे आरोपींना पकडण्यात यश मिळाले होते.विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण थोरात हे गुन्हे शाखा,अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असताना ब्राऊन शुगर, गांजा विक्री असे गुन्हे उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले असून त्यांना आतापर्यंत 251 बक्षिसे मिळाली आहेत. तसेच 2011 साली पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक मिळाले आहे.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक भोसले यांना पोलीस दलामध्ये आत्तापर्यंत 265  बक्षीसे मिळाली असून पोलीस महासंचालक यांचे उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक मिळाले आहे.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांनी खून, बलात्कार, दरोडा अशा गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना देखील 2018 मध्ये ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.