Chinchwad : ईद ए मिलाद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांसोबत शांतता बैठक

एमपीसी न्यूज – ईद ए मिलाद, गुरुनानक जयंती आणि अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या शांतता कमिटी, दक्षता कमिटी, विविध मुस्लिम संघटना, पोलीस मित्र, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी सर्व सण-उत्सव शांततेत आणि उत्साही वातावरणात साजरे करण्याचे ठरले. पोलीस प्रत्येक पातळीवर सतर्क असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.

गुरुवारी (दि.7) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या बैठकीसाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त प्रकाश मुत्याळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, नीलिमा जाधव तसेच भाईजान काजी, याकूब खान शेख, शिवदास महाजन, सुरेश गदिया यांच्यासह पोलीस अधिकारी आणि सामाजिक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस मित्र उपस्थित होते.

पोलीस सहआयुक्त प्रकाश मुत्याळ म्हणाले, शांततामय सणोत्सवाची पिंपरी-चिंचवडमध्ये परंपरा आहे. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधव परंपरेप्रमाणे मिरवणूक काढतात. त्यांना पोलिसांचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तसेच काही अडचण आल्यास पोलीस तत्पर राहणार आहेत. मिरवणुकीसंदर्भात काही नियमांबाबत त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे  सर्वांनी पालन करावे. येत्या काही दिवसात अयोध्या येथील राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय जाहीर करण्याची शक्यता आहे. निकाल काही असला तरी आपण सर्वांनी त्याचा आदर करावा.

मात्र, या परिस्थितीचा फायदा घेऊन काही समाजकंटक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे आपण सर्वांनी सावध राहायला हवे. फेसबुक, व्हाट्सअप व अन्य सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. काही समाजकंटक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी या माध्यमांचा वापर करू शकतात. अफवा पसरवणा-यांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेऊन त्यांना अफवा पसरवणा-या समाजकंटकांपासून वाचवावे. पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. सर्व बांधवांनी सणोत्सव नियमांना धरून साजरे करावे, असे आवाहन मुत्याळ यांनी यावेळी केले.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, उत्सव साजरे करताना आवाजाची तीव्रता व इतर नियमांचे पालन करावे. प्रत्येक सामान्य माणूस हा पोलिसांचा प्रतिनिधी आहे. यामुळे तुम्हाला कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच इतर कोणी घडवत असल्यास पोलिसांना माहिती देण्याची दक्षता घ्यावी. प्रत्येकाने आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. काही अडचण आल्यास पोलीस 24 तास आपल्या सोबत आहेत. यावेळी उपस्थितांनी कायदा सुव्यवस्था, सणोत्सव व वाहतूक याबाबत सूचना करत मत मांडले. या सूचनांचा विचार करून योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.