Bhosari News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रम्मी खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अत्तार वीटभट्टी, दापोडी येथील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. त्यात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 14 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) दुपारी करण्यात आली.

मंगेश सिताराम नवघणे (वय 44, रा. अत्तार विटभट्टी, दापोडी, पुणे) आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तार विटभट्टी, दापोडी येथील मंगेश सिताराम नवघणे याच्या घरामध्ये आर्थिक फायद्यासाठी पैशावर रम्मी नावाचा जुगार खेळला जात आहे. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

त्यानुसार गुरुवारी दुपारी पाच वाजता पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 14 हजार 270 रुपये रोख रक्कम आणि 40 रुपयांचे रम्मी जुगाराचे साहित्य असा एकूण 14 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.