Moshi : चिखलीतून उत्तरप्रदेशला 82 जणांना घेऊन जाणारा टेम्पो पकडला

एमपीसी न्यूज – कुदळवाडी, चिखली येथून उत्तर प्रदेश येथे 82 जणांना घेऊन जाणारा टेम्पो बुधवारी (दि. 8) पोलिसांनी पकडला. पुणे-नाशिक महामार्गावर मोशी टोल नाका येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.

गोविंद राम सुखहारी (वय 24, रा. कुदळवाडी चिखली मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. यासह टेम्पोच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दत्तात्रय बबन शिंदे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सबंध देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची वाहतुक सुरू आहे. या काळात आरोपींनी आपसात संगणमत करून टेम्पोतून 82 जणांना कुदळवाडी चिखली येथून उत्तर प्रदेश येथे नेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास टेम्पो मोशी टोलनाका येथे आला असता वाहतूक पोलिसांनी टेम्पो अडविला. टेम्पोमध्ये 82 प्रवासी होते. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.