Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 387 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास, विनाकारण घराबाहेर फिरल्यास, जमाव केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि.18) 387 जणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई केली जात आहे

तसेच विनाकारण घराबाहेर फिरणे, एका ठिकाणी गर्दी करणे अशा कृत्यांवर देखील पोलीस बारीक लक्ष ठेऊन आहेत. असे प्रकार निदर्शनास येताच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 35 जणांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली. त्यात शहराचे माजी महापौर यांचा देखील समावेश होता. कायद्यापुढे सर्व समान असे म्हणत पोलीस कारवाई करीत आहेत.

शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे चिंचवड (17), भोसरी (8), एमआयडीसी भोसरी (3), आळंदी (4), चाकण (3), वाकड (16), सांगवी (1), तळेगाव दाभाडे (16) एकूण 68 जणांवर कारवाई करण्यात आली.

तर सीआरपीसी 149 प्रमाणे पिंपरी (5), भोसरी (37), एमआयडीसी भोसरी (29), दिघी (31), आळंदी (1), वाकड (1), हिंजवडी (120), सांगवी (18), चिखली (10), देहूरोड (10), तळेगाव दाभाडे (31), तळेगाव एमआयडीसी (10), रावेत चौकी (11), शिरगाव चौकी (5) असे एकूण 319 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.