Hadpsar : शाळा व कॉलेजच्या परिसरामध्ये मुलींची छेड काढणा-या टवाळखोरांना पोलिसांकडून अद्दल

एमपीसी न्यूज – हडपसर येथील शाळा व कॉलेजच्या परिसरामध्ये मुलींची छेडछाड करणा-या एकूण 28 टवाळखोर मुलांना त्यांच्या मोटार सायकलिंसह पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांनी अद्दल घडवली आहे. ही कारवाई काल शुक्रवारी (दि. 7) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हडपसर येथील साधना शाळा व कॉलेज, आण्णा साहेब मगर कॉलेज, एस. एम. जोशी कॉलेजच्या परिसरामध्ये केली गेली. त्यापैकी 22 प्रौढ मुलांवर कारवाई करून 6 अल्पवयीन मुलांना योग्य ती समज देण्याचे काम पोलिसांनी केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील कॉलेजच्या परिसरामध्ये टवाळखोर मुले मुलींची छेडछाड करून कॉलेजमधील मुलींना त्रास देत असल्याची तक्रार हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्याकडे शिक्षकांनी व पालकांनी स्वतः येऊन दिली होती. त्याप्रमाणे सुनील तांबे यांनी टवाळखोरांना आळा घालण्यासाठी तीन पथके तयार केली.
या पथकांनी हडपसर येथील साधना शाळा व कॉलेज, आण्णा साहेब मगर कॉलेज, एस. एम. जोशी कॉलेजच्या परिसरामध्ये शाळा व कॉलेज सुटण्याच्या वेळेस बारकाईने निरीक्षण केले असता काही टवाळखोर मुले हे कॉलेजच्या परिसरामध्ये मोटारसायकलवरून काही कारण नसताना मुलींची टिंगल टवाळी करत फिरताना दिसले.

त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी अशा एकूण 28 टवाळखोरी करणाऱ्या मुलांना त्यांच्या मोटार सायकलींसह पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यापैकी 22 प्रौढ मुलांवर कारवाई केली व उर्वरित 6 अल्पवयीन मुलांना योग्य ती समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. त्याचबरोबर प्रौढ मुलांच्या पालकांना देखील पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. अशा प्रकारच्या काही तक्रारी असतील तर तात्काळ त्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशन येथे कळवावी, असे आवाहन यावेळी सुनील तांबे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.