Pimpri : उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर पोलीस खडबडून जागे, दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणाचा चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तपास करणार

दत्ता साने यांचे उपोषण मागे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाच्या तपासाकडे गांभीर्याने न पाहणारे पोलीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र येताच खडबडून जागे झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांचे पत्र आम्हाला मिळाले असून त्यानुसार आम्ही सखोल चौकशी करत आहोत. चिखली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत लवकरात लवकर तपास पूर्ण करुन चौकशीमध्ये निष्पन्न होईल. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पत्र पोलिसांनी साने यांना पाठविले आहे. त्यामुळे साने यांनी उपोषण स्थगित केले आहे.

साने यांच्या चिखली येथील साने चौकातील जनसंपर्क कार्यालयावर 7 जून 2019 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सहा ते सात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी कार्यालयात तोडफोड करून दहशत निर्माण केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. त्यानंतर मुख्य आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. हा हल्ला राजकीय सूडापोटी झाला असून पोलिसांनी तपासामध्ये या प्रकरणाला वेगळे वळण दिले.  या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार भोसरीतील भाजपचा बडा नेता असल्याचा आरोप साने यांनी केला होता. हत्येची सुपारी रावण टोळीतील दिनेश रेणवा याला दिल्याचा आरोप साने यांनी केला होता.

या प्रकरणात पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलल्याचा आरोप करत साने यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची तत्काळ दखल घेत पोलिसांना पत्र पाठविले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे. या अर्जाची आम्ही स्वत: चौकशी करत आहोत, असे पत्र अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी साने यांना दिले.

आपण उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत सखोल चौकशी केली जाईल. चिखली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत लवकरात लवकर तपास पूर्ण करुन चौकशीमध्ये निष्पन्न होईल. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पत्र पोलिसांनी साने यांना पाठविले आहे. त्यामुळे साने यांनी उपोषण स्थगित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.