Alandi : पार्किंगमध्ये जागा नसल्याचे सांगणा-या पोलीस कर्मचा-याला दुचाकीस्वाराकडून मारहाण

एमपीसी न्यूज – पार्किंगमध्ये जागा नाही, पुढच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करा, असे सांगणा-या पोलीस  कर्मचा-याला दुचाकीस्वार तरुणाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी पावणेअकराच्या सुमारास आळंदीमधील पीसीएमसी चौकात घडली.

पोलीस हवालदार बापूराव भीमराव नळकांडे यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माणिक संभाजी करत (वय 26, रा. आळंदी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार बापूराव सोमवारी सकाळी आळंदीमधील पीसीएमसी चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी नंबर नसलेली मोटारसायकल भरधाव वेगात घेऊन आला. बापूराव यांनी दुचाकीस्वाराला पार्किंगमध्ये जागा नाही, पुढच्या पार्किंगमध्ये गाडी लाव, असे सांगितले. आरोपी माणिक याने बापूराव यांच्या पायावरून दुचाकी पुढे नेली. त्यावेळी पोलीस नाईक शिर्के यांनी दुचाकीस्वाराला पार्किंगसाठी जागा नसल्याचे समजावून सांगितले. यावरून आरोपी माणिक याने पोलीस हवालदार बापूराव यांची गचांडी पकडून त्यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणला. यामध्ये बापूराव जखमी झाले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.