Pimpri: राजकीय गुन्हेगारीचा बिमोड; तडीपार गुंडाचा बंदोबस्त करा – श्रीरंग बारणे

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढा-यांसोबत वावर असतो. या गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असून यामुळेच शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासाठी पोलिसांनी अगोदर राजकीय गुन्हेगारीचा बिमोड करावा, राजकीय हस्तेक्षपाला आळा घालावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. तसेच तडीपार गुंड राजरोसपणे शहरात फिरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसाठी फोन करणा-या राजकीय पदाधिका-यांची नोंद ठेवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभम, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे  यांची भेट घेतली. आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने, विजया चव्हाण, विद्या जाधव, वैशाली कुलथे, भाग्यश्री म्हस्के, बाळासाहेब वाल्हेकर, भरत साळुंखे, सर्जेराव मारमोरे, उमेश रजपूत, रामदास केंदळे शिष्टमंडळात होते.

खासदार बारणे म्हणाले, “राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यानेच शहरातील सामूहिक गुन्हेगारी वाढली आहे. राजाश्रय मिळत असल्याने गुंडाची दहशत वाढली आहे. यामुळे औद्योगिक पट्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे हा राजश्रय मोडित काढणे करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शहरातील गुन्हेगारी कमी होणार नाही. तडीपार केलेले गुन्हेगार राजरोसपणे शहरात वास्तव्य करतात. वाकड, थेरगाव परिसरात सर्रासपणे तडीपारांचा वावर आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अवैध धंदे जोरात सुरु आहेत. पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पिडीताला पोलिसांकडून योग्य वागणूक दिली जात नाही. परस्पर सेटलमेंट करण्याची भाषा पोलिसांकडून केली जाते”

“औद्योगिकनगरीची ओळख पुसली जाऊ लागली असून बलात्कार, गुन्हेगारांचीनगरी अशी ओळख होऊ लागली आहे. हे अतिशय निंदनीय आहे. औद्योगिक पट्‌यात दहशत माजविली जात आहे. त्यामुळे उद्योग धंदे शहराबाहेर जात आहेत, याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे” असेही बारणे म्हणाले.

आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, “पिंपरी पोलीस ठाण्यासमोरच अवैध धंदे जोमात सुरु आहेत. दारु, मटक्यांचे अड्डे चालतात. पोलिसांना अवैध धंद्याची संपूर्ण माहिती असूनही त्यांच्याकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी”.   गजाजन चिंचवडे म्हणाले, ” चिंचवड पोलीस ठाण्यासमोरच ओपन बार सुरु आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे”  अॅड. उर्मिला काळभोर म्हणाल्या, “पोलीस ठाण्यातील दक्षता समित्या कार्यान्वित करण्यात याव्यात. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक असावी”

पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन म्हणाले, “गुन्हेगारी रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. कामचुकार अधिका-यांच्या बदल्या केल्या असून गुणवत्तेवर अधिका-यांच्या नेमणूका केल्या जात आहेत. गुणवत्ताधारक पोलिसांचा हेतू चांगला राहील. तडीपार गुंडाची माहिती काढण्यात येत आहे. त्यांच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता असून केवळ दीड हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत”.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून धमकी देणे, खंडणीची मागणी, शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण, लूट, लहान मुलींवरील अत्याचार, तडीपार गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून येणे, अवैध शस्त्र बाळगणे, वाहनांची तोडफोड अशा गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतातुर झाला असून तो सध्या भीतीच्या वातावरणात वावरत आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. तडीपार गुंडांकडून देखील अशा प्रकारचे गुन्हे केले जात आहेत. त्यामुळे शहरात कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.