Pimpri : ‘पोस्टा’च्या बेफिकीरीचा नवोदित वकील युवतीस फटका 

वकिलीची सनद पत्ता सापडत नसल्याचे कारण देत परत पाठवली 

एमपीसी न्यूज – पोस्टाने स्पीड पोस्ट सेवा सुरू केली खरी, पण कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे या सेवेची वाट लागत आहे. पिंपरीतील कोमल सातुर्डेकर या नवोदित वकील युवतीची स्पीड पोस्टाने आलेली सनद पत्ता सापडत नाही म्हणून पोस्टमनने परत पाठवली. ही सनद आणण्यासाठी युवतीला  पुन्हा मुंबईला जाऊन बार कौन्सिल ऑफिसमधून सनद आणावी लागली. दरम्यान, यामध्ये कोमलची बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा हुकली आहे. त्यामुळे तिला आता पुन्हा सहा महिने या परीक्षेची वाट पहावी लागणार आहे. 

पिंपरीतील कोमल सातुर्डेकर ही विद्यार्थिनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिने वकिलीची सनद घेण्यासाठी मुंबई येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे 16 ऑगस्ट रोजी सर्व कागदपत्रांसह रीतसर अर्ज दिला होता. 20 ऑगस्ट रोजी सनद स्पीड पोस्टने पाठवली. मात्र; पोस्टाने पत्ता सापडत नाही म्हणून ती परत पाठवली. 3 सप्टेंबरला याबाबत पिंपरी गावात पोस्टमनची जबाबदारी सांभाळत असलेल्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी असे पत्र आले होते. पण माझा गोंधळ झाल्याने मी परत पाठवले असे उत्तर दिले.

याबाबत पिंपरीच्या पोस्ट ऑफिस प्रमुखांशी संपर्क साधला असता तुम्ही तक्रार द्या. मी ती पोस्टाच्या सुप्रिटेंडंटला पाठवते असे सांगितले. मात्र, या प्रकारामुळे 4 सप्टेंबरला मुंबईत जाऊन सनद आणण्याची वेळ कोमल हिच्यावर आली. सनद मिळाल्यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत 1 सप्टेंबरला संपल्याने आता सहा महिने पुढच्या परीक्षेची वाट पाहण्याशिवाय तिच्यापुढे उपाय राहिला नाही. पोस्टाच्या या बेफिकीरीची शिक्षा नवोदित वकील युवतीस भोगावी लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.