Positive Story : अख्खे घर पॉझिटिव्ह अन् दहा महिन्यांचा चिमुकला निगेटिव्ह; शेजाऱ्यांनी केला चिमुकल्याचा सांभाळ

0

एमपीसी न्यूज – कोरोना झाला म्हटलं की रक्ताची नाती दुरावतात. प्रत्यक्ष तर सोडाच पण फोनवर बोलणंही वर्ज्य होतं. ज्या काळात मानसिक आधाराची, बोलण्याची सर्वाधिक गरज असते अशा काळात आपले म्हणवले जाणारे नातेवाईक दूर जाताना आढळतात. या काळात शेजारीच आपले वाटायला लागतात. शेजाऱ्यांनी दिलेला आपलेपणा पिंपरी चिंचवड शहरात बघायला मिळाला आहे. कुटुंबातील सगळे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले पण दहा महिन्यांचा चिमुकला निगेटिव्ह आला. या चिमुकल्याचा शेजारच्यांनी आपलेपणाने सांभाळ करून त्याला मायेची ऊब दिली. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले कुटुंब शेजाऱ्यांच्या स्नेहाचे ऋणी झाले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या राजश्री सावंत यांच्या कुटुंबात हा अनुभव आला आहे. सावंत यांच्या कुटुंबात पती, पत्नी, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असे सहा सदस्य आहेत. सावंत यांच्या पती, मुलगा आणि मुलगी या तिघांचा कोरोना चाचणी अहवाल 5 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. यामुळे सावंत कुटुंब हादरून गेले. त्यानंतर 14 एप्रिल रोजी राजश्री सावंत आणि त्यांच्या सुनेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

यानंतर मात्र सावंत कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांच्या घरात ओजस हा दहा महिन्यांचा मुलगा निगेटिव्ह होता. संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आल्याने ओजसला ठेवायचे कुठे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. त्याला त्याच्या आजोळी पाठवायचे म्हटले तर जिल्हाबंदी असल्याने आणखी अडचणी वाढल्या.

कुटुंबात सगळे आहेत पण आपल्याला कोणीच कडेवर घेत नाही. आपले लाड करत नाही. असे अनेक प्रश्न एकांतात बसलेल्या दहा महिन्यांच्या ओजसच्या मनात कित्येक वेळा आले असतील. आईने आपल्याला उचलून घ्यावे, आजी-आजोबांनी आपल्याला खेळवावं. बाबांनी आपले लाड करावेत असंही त्या चिमुकल्याला वाटत असेल. पण कोरोना नावाच्या आडकाठीने सावंत कुटुंबाला अडवले होते.

_MPC_DIR_MPU_II

शहरातच राहणाऱ्या काही नातेवाईकांनी सावंत कुटुंबाकडे येणं टाळलं होतं. त्यासाठी कारणही तसंच होत म्हणा. पण ‘जिथे नाती संपतात तिथे शेजारधर्म सुरू होतो’ याप्रमाणे सावंत यांच्या शेजारी राहणारे होनकर कुटुंबाने सावंत कुटुंबाला धीर दिला. ओजसला कुठेही पाठवायचे नाही. त्यात त्याचे हाल होतील. आमच्या घरात असा प्रसंग घडला असता तर आम्ही आमच्या बाळाला सांभाळलं असतंच की, असं म्हणत होनकर कुटुंबाने सावंत कुटुंबाला धीर दिला.

ओजसला होनकर कुटुंबाने त्यांच्या घरी नेले. त्याचे लाड केले. त्याला खाऊ-पिऊ घालून खेळवून त्याला अंघोळ घातली. त्याचं सगळं हवं नको ते बघितलं. दरम्यान ओजसच्या वडिलांनी काही दिवसानंतर पुन्हा टेस्ट केली. त्यात ओजसचे वडील आणि आजोबा निगेटिव्ह आले तर आत्या पुन्हा पॉझिटिव्ह आली.

होनकर, घोडके, बोराडे, राणे, जराड या कुटुंबांनी सावंत कुटुंबियांना जेवण, औषधांपासून ते ओजसला संभाळण्यापर्यंत सर्व मदत केली. शाळेतले शिक्षक यासोबतच डॉ. तपशाळकर, डॉ. अजिंक्य तेलंगे यांच्या मानसिक आधारामुळे सावंत कुटुंब कोरोना सारख्या संकटातून सुखरूप बाहेर आले असल्याचे राजश्री सावंत म्हणाल्या.

संकटात नाती दूर जातात. पण शेजारी राहणारी आपली माणसंच आपल्या कामी येतात. कोणतंही संकट येऊ द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास हे सख्खे शेजारी देतात. कोरोनाच्या काळातही ही माणसं माणुसकीचा ओलावा देतात, असेही सावंत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment