Manmad News : सकारात्मक ! पाच वेळा हृदय विकाराचा झटका आलेल्या 92 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – देशासह राज्यात कोरोनाची भयावह आकडेवारी समोर येत आहे. दररोज अडीच हजार रुग्ण आपला जीव गमावत आहेत. अशात मनमाड येथून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पाच वेळा हृदय विकाराचा झटका आलेले, मधुमेह, रक्तदाब यासारख्या व्याधी असलेल्या 92 वर्षीय आजोबांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. 

नामदेव किसन शिंदे (वय 92, रा. मनमाड, जि. नाशिक) असे या आजोबांचे नाव आहे. नामदेव शिंदे यांचा मुलगा दिपक शिंदे यांनी ‘एमपीसी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘माझ्या वडिलांवर मनमाड येथील खासगी रुग्णालयात हृदयसंबधित व्याधीचे उपचार सुरू आहेत. दरम्यान च्या काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांचा एचआरसीटी स्कोर 13 आला. पुढील उपचारासाठी त्यांना नांदगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला.’

‘उपचारादरम्यान त्यांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. त्यांना पाच वेळा हृदय विकाराचा झटका आला होता, तसेच मधुमेह, रक्तदाब यासारख्या व्याधी आहेत. तरीही त्यांनी जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली’ असे, दिपक शिंदे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. राज्यात दररोज कोरोनामुळे होणा-या मृतांची संख्या देखील वाढली आहे. अशात मनमाड येथील हि बातमी सकारात्मक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.